नीरव मोदीची 637 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नीरव मोदीची 637 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : गैरव्यवहार करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या देश-परदेशातील सर्व संपत्तीवर केंद्र सरकारने टाच आणली. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईमध्ये मोदीची एकूण 637 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

या कारवाईत मोदीचे आलिशान फ्लॅट्‌स, बँक खाती सील केली आहेत. यात भारतासह ब्रिटन आणि अमेरिकेतील मालमत्तेचा समावेश आहे. 

पंजाब नॅशनल बँकेची 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोदीवर आरोप ठेवण्यात आला आहे. गुन्हेगारी स्वरूपातील कारवाईमध्ये परदेशातील मालमत्तेवर कारवाई करण्याची ही भारतातील दुर्मिळ घटना आहे. 

मोदीवर जानेवारीमध्ये सीबीआयने पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर मोदीने 22.69 कोटी रुपयांचे दागिने हॉंगकॉंगमध्ये पाठविले होते. हे दागिनेही पुन्हा भारतात आणण्यात आले आहेत. हॉंगकॉंगमधील एका खासगी बँकेत मोदीच्या वैयक्तिक खात्यामध्ये हे दागिने जमा करण्यात आल्याचा आरोप झाला होता. सुरवातीला या दागिन्यांची एकूण किंमत 85 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा झाला होता; मात्र स्वतंत्र तपासणीनंतर हे दागिने 22.69 कोटी रुपयांचे असल्याचे स्पष्ट झाले. 

मोदीची बहीण पूर्वी मोदी हिच्या नावे असलेल्या लंडनमधील घरावरही 'ईडी'ने कारवाई केली आहे. या घराची किंमत 57 कोटी रुपये आहे. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून लाटलेल्या पैशांतून हे घर विकत घेतल्याचा आरोप 'ईडी'ने ठेवला आहे. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क भागातील दोन प्रशस्त घरांवरही टाच आणण्यात आली आहे. या दोन्ही घरांची किंमत 216 कोटी रुपये आहे. ही घरे नीरव मोदीची पत्नी ऍमी मोदी हिच्या नावे आहेत. 

बँकेची फसवणूक केल्यानंतर ते पैसे अत्यंत हुशारीने दुबई, बहामा, अमेरिका आणि सिंगापूर येथे वळविण्यात आल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. यामुळे विविध देशांतील न्याय व तपास यंत्रणांशी समन्वय साधण्याचे आव्हान भारतीय तपास यंत्रणांसमोर आहे. 

याशिवाय, दक्षिण मुंबईतील पूर्वी मोदीच्या नावे असलेले 19.5 कोटी रुपयांचे घरही 'ईडी'ने जप्त केले आहे. नीरव मोदी, पूर्वी मोदी आणि त्यांच्या कंपन्यांच्या विविध खात्यांमध्ये मिळून 278 कोटी रुपये होते; ती खातीही सील केली आहेत. या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर वरीलपैकी बहुतांश खात्यांमध्ये पैसे वळविण्यात आल्याचे तपासात आढळून आल्याने ही कारवाई झाली आहे.

Web Title: Nirav Modi's property Worth Rs. 637 Crore Seized in connection of PNB Scam by ED 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com